चिपळूण : राज्यातील 43 शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापकांची वानवा आहे. पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असतानादेखील अद्याप 800 प्राध्यापकांची पदे रिक्तच असून, ती अद्याप भरलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
राज्यामध्ये 43 शासकीय तंत्रनिकेतन आहेत. मात्र, त्यातील जवळपास सर्वच शासकीय तंत्रनिकेतनमध्ये गेली काही वर्षे अधिव्याख्यात्यांच्या जागाच भरलेल्या नाहीत. राज्यात पॉलिटेक्निकमध्ये 60 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र, शिकवण्यास प्राध्यापकच नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. या माध्यमातून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असलेल्या उत्तम शैक्षणिक परंपरा मोडीत काढण्याचे षड्यंत्र रचले जाते आहे का? असा सवाल विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रशिक्षण पॉलिटेक्निक अर्थात तंत्रनिकेतनमध्ये दिले जाते. एकेकाळी या ठिकाणी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत असे. शासकीय तंत्रनिकेतन म्हटले की, विद्यार्थ्यांना मेरिटवर प्रवेश मिळत होता. मात्र, शासकीय पॉलिटेक्निकची अवस्था आता बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांनी अध्ययन करायचे कसे?हा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात तंत्रनिकेतनमध्ये 60 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात. इंजिनिअरिंगचे विषय पॉलिटेक्निमध्ये शिकविले जातात आणि डिप्लोमा ही पदवी मिळते. मात्र, शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थी तंत्रशिक्षणामध्ये पारंगत कसे होणार? हा प्रश्न आहे. गेली काही वर्षे रत्नागिरी, मालवणसह राज्यातील अनेक शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विषयवार अधिव्याख्यातेच नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. राज्यात पॉलिटेक्निकचे 2 हजार 467 अधिव्याख्यात्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1,666 पदे भरलेली आहेत तर 801 पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंजूर पदांच्या अवघ्या 67 टक्के अधिव्याख्याते शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आहेत, तर 33 टक्के जागा रिक्त आहेत. या संदर्भात उच्च शिक्षणमंत्र्यांनी कोणतीच पाऊले उचललेली नाहीत. गेली अनेक वर्षे राज्यात हीच परिस्थिती असून, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालये अडचणीत आली आहेत.
सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल शाखा अडचणीत
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असलेल्या विद्या शाखांपैकी प्रभावी म्हणून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, कॉम्प्युटर या शाखांकडे पाहिले जाते. मात्र, सद्यस्थितीत प्राध्यापकांअभावी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल शाखा अडचणीत आल्या आहेत. शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. राज्यात सिव्हिलसाठी 261 पैकी तब्बल अधिव्याख्यात्यांच्या 149 जागा रिक्त आहेत. मेकॅनिकलच्या 435 पैकी 133, इलेक्ट्रीकलच्या 236 पैकी 76 तर कॉम्प्युटरच्या 240 पैकी 47 जागा रिक्त आहेत. तंत्रनिकेतनच्या एकूण 36 विद्या शाखांमध्ये कमी-जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 18-07-2025














