चिपळूण : ठाकरे शिवसेना आता शिवबंधन कोकण परिक्रमा यात्रेतून पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ९ ऑगस्टला क्रांतिदिनी रायगड किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात करणार आहेत, रायगड, रत्नागिरी येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे,
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना गट यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पराभवाने मनोधैर्य खचलेल्या ठाकरे शिवसेनेच्या कार्यकत्यांमध्ये हा दौरा कितपत ऊर्जा टाकू शकणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यामध्ये आगामी काळात ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही प्रक्रिया सुरूही झाली आहे. लवकरच प्रभागनिहाय आरक्षणही निश्वित होईल. त्यामुळे आपल्या पक्षातील कार्यकत्यांना सक्रिय करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबईतील शिवसेना भवन येथे कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीमध्ये शिवबंधन कोकण परिक्रमा यात्रेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे गणेशोत्सवापूर्वी कोकणचा दौरा करणार आहेत. कोकणातील कार्यकत्यांना चळ देण्यासाठी रायगड ते सिंधुदुर्ग अशी ही परिक्रमा यात्रा आहे.
कोकणात ठाकरे शिवसेना शिवबंधन कोकण परिक्रमा यात्रा काढणार आहे. त्याची प्राथमिक तयारी सुरू आहे. मुंबईच्या बैठकीला तिन्ही जिल्ह्यांतील सर्व नेते उपस्थित होते. या तीन जिल्ह्यांतील नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होईल आणि यात्रेचे स्वरूप फायनल होईल, कुठे बैठका घ्यायच्या आणि पक्षप्रमुख ठाकरेंचा मुक्काम कुठे असेल, हे त्या बैठकीमध्ये ठरेल. – विनायक राऊत, शिवसेना, सचिव
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 18/Jul/2025














