खेड – खेड तालुक्यातील लवेल येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ७९,३९५/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १५ जुलै रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १६ जुलै रोजी दुपारी २ वाजून ५४ मिनिटांच्या दरम्यान घडली असल्याचा अंदाज आहे.
या प्रकरणी, अमितकुमार मनोहर सागवेकर (वय ४२, रा. अंबरनाथ वेस्ट, मूळ रा. श्री स्वामी समर्थ, लवेल, नवानगर, घर्डा हॉस्पिटल समोर, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी १७ जुलै रोजी रात्री ११ वाजून ८ मिनिटांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. खेड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) नुसार गुन्हा (गु.र.नं. २२९/२०२५) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी फिर्यादींच्या घराच्या कंपाऊंडचे लोखंडी गेटचे स्टीलचे लॉक कोणत्यातरी हत्याराने कापले. त्यानंतर, घराच्या दर्शनी दरवाजाची पितळी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन नंबरच्या बेडरूममधील लोखंडी कपाट, लाकडी टेबल आणि देवघरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी जुने सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि अन्य वस्तू चोरून नेल्या आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 18-07-2025














