चिपळूण : फुलांचे दर ७० ते ८० टक्क्यांनी वधारले

चिपळूण : श्रावण महिन्यात सण आणि व्रतवैकल्य मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्यामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या मागणीत वाढ होते. या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील फुलबाजार गजबजण्यास सुरुवात झालेली आहे; मात्र, यंदा फुल उत्पादनावर मुसळधार पावसाचे सावट निर्माण झाले आहे. मागील १५ दिवसांपासूनच सर्वच फुलांचे दर ७० ते ८० टक्क्यांनी वाढलेले आहेत.

श्रावण महिन्यात फुले उपलब्ध करून देण्यासाठी सर्वत्र विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे. या काळात सजावट व पूजेसाठी फुलांची खरेदी केली जाते. या महिन्यापासून सुरू होणारे सणवार कमी-अधिक प्रमाणात डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू राहतात. चातुर्मासात अनेक मुहूर्त असल्याने नवीन वस्तू किंवा कार्याला प्रारंभ केला जातो. त्यामुळे फुलांच्या मागणीत दुप्पट वाढ होते. सध्या बाजारात गुलाब, मोगरा, पिवळा चाफा, शेवंती, झेंडू, कमळ, जरबेरा, निशिगंधा, अस्टर तसेच धोतऱ्याची फुले विक्रीसाठी दाखल झाली आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हाभर पाऊस पडत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊन शेतातच फुले कोमेजली. परिणामी, दर्जेदार व कोरड्या फुलांची बाजारातील आवक सुरुवातीपासूनच घटली.

त्यामुळे श्रावणाच्या सुरुवातीपासूनच चढ्या दराने फुले खरेदी करावी लागणार आहेत. सध्या बाजारातून मोगरा गायब झाला असून, इतर फुलांच्या दरातही ७० ते ८० टक्क्यांची वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वी ५० रुपये डझन असलेला गुलाब ८० रुपयांवर गेला आहे. हे दर अजून वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देवाच्या पूजेसाठी चांगली आणि टवटवीत फुले वापरावी लागतात. त्यामुळे चांगली फुले खरेदी केली जातात; मात्र, सध्या अशी फुले बाजारात दिसत नाहीत. नाइलाजाने जास्त दराने फुलांची खरेदी करावी लागत आहे- उज्ज्वला जाधव, ग्राहक, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 18/Jul/2025