राजापूर – राजापूर तालुक्यातील डोंगर फाटा येथे १७ जुलै रोजी दुपारी ३.५० वाजण्याच्या सुमारास एका धक्कादायक घटनेत, एका कुटुंबाला मारहाण करून त्यांच्याकडून फोन पे द्वारे ४००० रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईकडून वेंगुर्ल्याकडे जाणाऱ्या एका कुटुंबाच्या गाडीला पाठीमागून धडक देऊन, त्यानंतर गाडीतील ७ ते ८ जणांनी त्यांना मारहाण केली आणि पैसे जबरदस्तीने काढून घेतले.
या प्रकरणी, श्री. शशिकांत शंकर परब (वय ६०, रा. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपला मुलगा शुभम परब आणि मित्र हर्षल नागेश साटेलकर यांच्यासोबत मुंबईकडून वेंगुर्ल्याकडे त्यांच्या मारुती सुझुकी एस.एक्स.४ (क्र. एम.एच.०२. व्ही.पी. ५९२२) गाडीने जात होते. राजापूर येथील पूल ओलांडून डोंगर फाटा येथे पोहोचताच, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने (क्र. एम.एच.१८. ए.जे.७०५६) त्यांच्या गाडीला डाव्या बाजूने धडक दिली.
धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओ गाडीतून अभिषेक परमेश्वर लोखंडे आणि त्याच्यासोबतचे इतर ७ ते ८ जण (अंदाजे वय २० ते ३५ वर्षे) खाली उतरले. त्यांनी तात्काळ शशिकांत परब यांचा मुलगा शुभम परब आणि त्याचा मित्र हर्षल नागेश साटेलकर यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. एवढेच नाही, तर त्यांना पकडून त्यांच्याकडून फोन पे द्वारे ४०००/- रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजापूर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमांन्वये (कलम १८९(२), १९१(२), १९०, १२७ (७), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(२), २८१, मोवाका १८४) गुन्हा (गु.र.नं. १३४//२०२५) दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 18-07-2025














