चिपळुणात भीषण अपघात : पाग पावरहाउसजवळ भरधाव टाटा मांझाची ॲक्टिव्हाला धडक, एक गंभीर जखमी!

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील पाग पावरहाउसजवळ १६ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात ॲक्टिव्हा चालक गंभीर जखमी झाला आहे. गोवा बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा मांझा गाडीने ॲक्टिव्हाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

या प्रकरणी, सिद्धेश प्रमोद भालेकर (वय २४, रा. खंड दळी चाल, परांजपे हायस्कूलच्या मागे, चिपळूण) यांनी १७ जुलै रोजी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रवीण श्रीराम गोळमोडे (वय २१, रा. गुरव वाडी, चिपळूण) या टाटा मांझा चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२३ (ब) आणि मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा (गु.र.नं. १६५/२०२५) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे काका संदेश सीताराम भालेकर (वय ५५, रा. चिपळूण) हे चिंचनाका येथून कापसाळ येथील आपल्या घरी ॲक्टिव्हा (क्र. एमएच-०८-एएच-५८२८) वरून जात होते. पाग पावरहाउसजवळ ते हायवे रस्ता ओलांडत असताना, गोवा बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या टाटा मांझा गाडी (क्र. एमएच १२ जी.के-०८४६) वरील चालक प्रवीण गोळमोडे याने आपली गाडी हयगयीने आणि बेदरकारपणे चालवून संदेश भालेकर यांच्या ॲक्टिव्हाला जोरदार धडक दिली.

या धडकेत संदेश भालेकर यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या असून ते जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पाग पावरहाउस परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 18-07-2025