रत्नागिरी पालिकेचा स्तुत्य उपक्रम : २० सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीचे नियुक्तीपत्र!

रत्नागिरी, १७ जुलै : रत्नागिरी नगरपरिषदेने लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार २० सफाई कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देऊन एक कौतुकास्पद आदर्श घालून दिला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे डॉ. सामंत यांनी यावेळी नमूद केले.

रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी, “हालअपेष्टा सहन करत आई-वडिलांनी या नगरपालिकेची सेवा केली. सफाई कामगार म्हणून या जनतेची सेवा केली. जनतेला रोगराई होऊ नये, म्हणून रत्नागिरी शहराची स्वच्छता ठेवण्याचे काम त्यांनी केलं. त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या पुण्याईमुळे आज नोकरीचे पत्र मिळतंय, याची जाणीव पत्र मिळणाऱ्या प्रत्येक वारसाला असली पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन भविष्यामध्ये या नगरपालिकेमध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम करावं,” असे आवाहन केले.

यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे, बंड्या साळवी, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, विजय खेडेकर, स्मिता पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नियुक्तीपत्र मिळालेल्या कर्मचाऱ्यांची नावे : रूपेश शरद भाटकर, प्रशांत श्रीकांत कोलगे, पारस विनायक जोशी, टीना आनंद गुरव, अविनाश सुरेश घाणेकर, प्रभंजन दिपक बोरकर, धर्मनाथ रामचंद्र कळंबटे, संदेश वसंत सुवारे, समिक्षा सत्यवान खुळे, अजय गोविंद लाड, सर्वेश राजेंद्र वीर, प्रसाद दयानंद बारे, सोनाली प्रितम आयरे, सामिल दशरथ नागवेकर, ऋषीकेश मोहन शेलार, निलेश तुकाराम पावसकर, समीर प्रभाकर मयेकर, अक्षय संजय हातिसकर, योगेश दिलीप पवार, नितेश दत्ताराम शिनगारे

पालकमंत्री डॉ. सामंत पुढे म्हणाले की, “लाड-पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे कुटुंबाच्या वारसांना नोकरी देणे हा खंडपीठाचा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रातला हा पहिला उपक्रम आहे. किती विधायकदृष्ट्या नगरपालिका काम करते आणि भविष्यामध्ये देखील रत्नागिरीच्या उद्धारासाठी काय करणार आहे, हा आदर्श निर्माण करणारा असा कार्यक्रम आहे. कर्मचाऱ्यांना जे पत्र देतोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढाकाराने रत्नागिरी शहर सर्वांग सुंदर राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो.”

मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. रत्नागिरी नगरपालिकेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 18-07-2025