दापोलीत सुवर्णदुर्ग गौरवयात्रेतून आनंदोत्सव साजरा

दापोली : तालुक्यातील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नुकताच समावेश झाल्यानंतर, या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून ज्ञानदीप संस्था, ज्ञानदीप फाउंडेशन, सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्ञानदीप विद्यामंदिर (प्राथमिक व माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सुवर्णदुर्ग गौरवयात्रेचे आयोजन करण्यात आले.

ही गौरवयात्रा अत्यंत भव्य आणि उत्साहात पार पडली. दापोलीकर नागरिक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी एकात्मतेने सहभाग नोंदवला. सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी किल्ल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर अभ्यासपूर्ण व्याख्यान घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत रॅली काढली. रॅलीमध्ये पारंपरिक लेझीम पथक आणि वाद्यवृंदाच्या गजरात वातावरण भारावून गेले.

यात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि मावळे यांच्या वेशभूषेत सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तलवारी, भाले, ढाल, आणि पारंपरिक पोशाख यामुळे इतिहास जणू जिवंत झाल्याचा अनुभव दापोलीकरांनी घेतला. शिवकालीन जयघोष आणि मावळ्यांच्या शौर्यगाथेने संपूर्ण शहरात इतिहासावरील अभिमानाची लाट उसळली.

या शोभायात्रेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, इतिहासविषयक व्याख्यान यांचा समावेश होता. संपूर्ण दापोली शहराने हा क्षण एक उत्सव म्हणून साजरा केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गौरव मशाल आणि रॅलीचे स्वागत करत एकजुटीचा संदेश दिला.

कार्यक्रमाला तहसीलदार अर्चना बोंबे, दापोली नगराध्यक्ष सौ. कृपाताई घाग, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. साधना बोत्रे, प्रदेश सरचिटणीस रमा बेलोसे, शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड, लायन्स क्लब अध्यक्ष अतुल मेहता, गोपाळकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष प्रसाद मेहता, धर्मवीर हिंदुराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश भांबीड, यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून गौरवयात्रेला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक शाळा, संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी येथील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या निमित्ताने बोलताना ज्ञानदीप संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरोजताई मेहता म्हणाल्या, “सुवर्णदुर्गचा युनेस्को मान हा संपूर्ण कोकणाचा सन्मान आहे. नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि इतिहासाची जाणीव होण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी सादर केलेली वेशभूषा इतिहासाशी जुळवणारा प्रेरणादायी प्रयत्न होता.”

या गौरवसोहळ्याने दापोलीतील नागरिकांमध्ये सांस्कृतिक चेतना निर्माण केली असून, हा दिवस इतिहासाच्या गौरवाचा एक अविस्मरणीय क्षण ठरला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 18/Jul/2025