गुहागरमध्ये बेशिस्त पार्किंग जीवावर बेतण्याची शक्यता; शृंगारतळी येथे दुचाकीमुळे वाहतुकीस अडथळा!

रत्नागिरी, १७ जुलै : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी पोलीस चौकीजवळ भररस्त्यात दुचाकी उभी करून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी, १७ जुलै रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

गुहागर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई प्रितेश परशराम रहाटे (वय ३४) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मयूर मधुकर शेळके (वय ३६, रा. पालपेणे, तळायचीवाडी, ता. गुहागर) याने त्याची होंडा शाइन मोटारसायकल (एम.एच. १७ बी.क्यू. ५२७३) शृंगारतळी पोलीस चौकीजवळ गुहागर ते चिपळूण रस्त्यावर उभी केली होती.

ही दुचाकी अशा प्रकारे उभी केल्यामुळे ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत होता. तसेच, यामुळे पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यताही होती.

या गंभीर प्रकाराची दखल घेत गुहागर पोलिसांनी मयूर शेळके विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हा (गु.र.नं. ४८/२०२५) दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 18-07-2025