दापोली, १७ जुलै: दापोली तालुक्यातील कर्दे येथील समुद्रकिनाऱ्यालगतच्या झाडीझुडपांच्या आडोशाला बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १६ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता करण्यात आली.
या प्रकरणी, दापोली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल पंकज फलचंद पवार (पो.कॉ./०१) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आरोपी विष्णू धोंडू गावणक (वय ३६, रा. कर्दे, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा (गु.र.नं. १३६/२०२५) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमूद केलेल्या दिवशी आणि वेळी पोलिसांनी कर्दे खाडीजवळच्या झाडीझुडपांच्या आडोशाला छापा टाकला. त्यावेळी आरोपी विष्णू गावणक हा स्वतःच्या ताब्यात एका पांढऱ्या रंगाच्या १० लिटर मापाच्या प्लास्टिक कॅनमध्ये १० लिटर गावठी हातभट्टीची दारू बाळगून असताना मिळून आला. या दारूची किंमत अंदाजे ९५०/- रुपये आहे.
या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 18-07-2025














