रत्नागिरी, १७ जुलै: रत्नागिरी शहरात चर्मालय ते कोकणनगर जाणारे रोडवरील क्रांतीनगर कमानीच्या बाजूला एका टी स्टॉलच्या बोळात बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई १७ जुलै रोजी दुपारी १.१० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार उमेश कृष्णा पवार (पोहेका/१३७२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, निहाल करीम होडेकर (वय २४, रा. मिरकरवाडा, वरचा मोहल्ला, रत्नागिरी) याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा (गु.र.नं. ३२७/२०२५) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकला असता, आरोपी निहाल होडेकर हा रावजी टी स्टॉलच्या बोळात बिगरपरवाना कल्याण मटका जुगाराचा खेळ पैशांवर खेळताना मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून ९३०/- रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
रत्नागिरी शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली असून, या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 18-07-2025














