रत्नागिरीत २९ रोजी महिला लैंगिक अत्याचाराविषयक कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी : महिलांच्या अनैतिक व्यापाराच्या घटना आता कोकणातही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या अनुषंगाने ‘अन्याय रहित जिंदगी’ (ARJ) ही एनजीओ गोवा येथे मानव तस्करी थांबवण्यासाठी व अशा बचावलेल्या महिलांच्या पुनर्वसनाचे काम करते. महिलांच्या या लैंगिक शोषणाबद्दल जागरूकता वाढावी आणि तस्करीला आळा बसावा, या उद्देशाने ‘अन्याय रहित जिंदगी’चे कार्यकर्ते व मनोविकारतज्ज्ञ यांनी मंगळवार, दि. २९ रोजी विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. येथील न्यायालयाच्या सभागृहात सकाळी १०:३० ते दुपारी २ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

जुलै महिना मानव तस्करीबद्दल जाणीवजागृती करण्याचा महिना आहे. कुठलीही मुलगी, महिला स्वतःहून वेश्या होत नसते तर ती एका संघटित गुन्हेगार टोळीची शिकार बनत असते. बऱ्याचदा तिला यातून बाहेर पडायचे असले तरी समाज तिला हवा तो आधार आणि मदत देत नसल्यामुळे अनेक महिला छळवणूक, आजार आणि अपमानास्पद आयुष्य जगत राहतात. बदलत्या काळात नवीन नवीन मार्गाने मुलींना फसवले जात आहे. समाज माध्यमांवर व्यक्त होत असलेली महिला अशा तस्करांच्या जाळ्यात अडकताना दिसतात. कोकणातही वाढत्या प्रमाणात मुली यात ढकल्या जात आहेत.

याबद्दल जागरूकता वाढावी आणि तस्करीला आळा बसावा या हेतूने हे शिबिर जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सर्व संघटना, शासकीय व निमशासकीय गट तसेच संवेदनशील व्यक्ती यांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी चिपळूण येथील डॉ. श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक येथे संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 18/Jul/2025