दापोली : गावतळे हायस्कूलच्या प्रत्येक वर्गाला किल्ल्यांचे नाव

दापोली : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या मनावर कोरला जावा, यासाठी तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.

प्रा. संदीप वारके यांच्या संकल्पनेतून शाळेतील पाचवी ते बारावीच्या प्रत्येक वर्गाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याचे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक वर्गाच्या दारावर संबंधित किल्ल्याचे छायाचित्र लावण्यात आले आहे. यामध्ये शिवनेरी, तोरणा, राजगड, पुरंदर, प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग अशा प्रमुख किल्ल्यांचा समावेश आहे. कार्यालय, ग्रंथालय, प्रयोगशाळा, सभागृह अशा ठिकाणांनाही गडकिल्ल्यांची नावे दिल्याने संपूर्ण शाळा जणू शिवकालीन इतिहास अवतरला आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा सखोल परिचय मिळत आहे. शिवचरित्रातून आत्मविश्वास, चिकाटी, दृढनिश्चय आणि नियोजन शिकविण्यावर भर दिला जात आहे, असे प्रा. संदीप वारके यांनी सांगितले.

या उपक्रमास शाळेच्या माजी विद्यार्थ्यांपासून स्थानिक उद्योजक, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त आर्थिक मदत केल्याचे प्राचार्या भक्ती सावंत यांनी आवर्जून सांगितले.

उपक्रमाला अशीही जोड
किल्ल्यांचे नाव वर्गाला देतानाच महाराजांची वंशावळ, आज्ञापत्र, मराठा कालखंड याची माहिती शाळेतील अनेक भागात फलकांवर लावण्यात आली आहे. प्रत्येक शाळेत असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत, अशी भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 18/Jul/2025