रत्नागिरीचा सुपुत्र सचिन काळे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार!

रत्नागिरी, १८ जुलै : रत्नागिरी जिल्ह्यातील सवे गावचे सुपुत्र आणि संगमेश्वरी बोलीभाषेतील हरहुन्नरी कलाकार सचिन काळे यांची झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कोकणातील लोककला आणि बोलीभाषेला आता राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सचिन काळे हे संगमेश्वरी बोली, कोकणातील लोककला आणि हास्यनाट्य या क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘कोकणचा साज- संगमेश्वरी बाज’ या त्यांच्या लोकप्रिय लोकनाट्य समूहाचे ते सेक्रेटरी आहेत. या लोकनाट्याच्या माध्यमातून त्यांनी कोकणातील जनतेला मनसोक्त हसविले असून, संगमेश्वरी बोलीला एक व्यासपीठ मिळवून दिले आहे.

आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात ते आपला विनोदी अभिनय सादर करताना दिसणार आहेत. त्यांच्या हसवणूक आणि संदेश यांचा सुंदर मेळ साधणाऱ्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सचिन काळे यांनी यापूर्वी रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या मराठी चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच, त्यांनी झी मराठीवरील एका स्कीटमध्ये अभिनेता ओंकार भोजने यांच्यासोबतही अभिनय केला होता.

या यशाबद्दल बोलताना सचिन काळे म्हणाले, “कोकणातील बोलीभाषा, हास्य आणि संस्कृती यांना मोठ्या व्यासपीठावर पोहोचवणे, हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा मंच मिळणे, हे माझ्यासाठी सन्मानजनक आहे. हे यश केवळ माझे नसून, कोकणातील सर्व लोककलेच्या कार्यकर्त्यांचे आहे.”

त्यांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाची आणि अभिनंदनाची लाट उसळली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, प्रेक्षकांनाही २६ जुलैपासून दर शनिवार आणि रविवार हा कार्यक्रम आवर्जून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:18 18-07-2025