रत्नागिरी, १८ जुलै : रत्नागिरीतील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘राधाकृष्ण श्री २०२५’ ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा वैश्य युवा संस्थेतर्फे १० ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त ही मानाची स्पर्धा राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ, रत्नागिरी येथे सायंकाळी ६.०० वाजता सुरू होईल.
या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून, ती चार गटांमध्ये घेण्यात येणार आहे. किताब विजेत्याला ११,०००/- रुपये रोख रक्कम आणि आकर्षक शिल्ड देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रत्येक गटात ५ क्रमांक निवडले जातील आणि त्यांना अनुक्रमे २,०००/-, १,५००/-, १,०००/-, ५००/-, आणि ५००/- रुपये रोख पारितोषिक व आकर्षक शिल्ड देण्यात येईल.
याव्यतिरिक्त, ‘बेस्ट पोझर’ आणि ‘उगवता तारा’ यांचीही निवड केली जाईल, ज्यांना प्रत्येकी १,०००/- रुपये रोख रक्कम आणि आकर्षक शिल्ड मिळेल. सर्व स्पर्धकांना आयोजकांकडून रात्रीचे जेवण दिले जाईल आणि रत्नागिरी तालुक्याबाहेरील स्पर्धकांना एकवेळचा बस प्रवास खर्च दिला जाईल.
ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने घेण्यात येणार आहे. राधाकृष्ण मंदिराचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू, सेक्रेटरी मकरंद खातू यांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. स्पर्धेचे आयोजन वैश्य युवा ही संघटना करत आहे.
इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे वेळेत देणे बंधनकारक असून, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता स्पर्धेच्या ठिकाणी हजर राहणे अनिवार्य आहे. या ‘राधाकृष्ण श्री २०२५’ स्पर्धेचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून फैय्याझ खतिब काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष सदानंद जोशी (८६६८३०६१४८), सेक्रेटरी जितेंद्र नाचणकर (८६६८३७५१७५) तसेच वैश्य युवाचे स्पर्धा प्रमुख सुनील बेंडखळे (९०२८४७८३४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













