रत्नागिरी, १८ जुलै: रत्नागिरी जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, रत्नागिरी पोलीस दलाने आज पहाटेपासून जिल्ह्यात व्यापक ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवले. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या सूचनेनुसार आणि नूतन अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८/०७/२०२५ रोजी मध्यरात्री ००.०० ते सकाळी ०४.०० वाजण्याच्या दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली.
या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी (रत्नागिरी) श्री. निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (चिपळूण) श्री. राजेंद्रकुमार राजमाने, परि. पोलीस उपअधीक्षक श्री. शिवप्रसाद पारवे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे हे स्वतः उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एकूण १० पोलीस निरीक्षक, ३३ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक आणि २८ पोलीस अंमलदार अशा मोठ्या फौजफाट्याने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
कारवाईचा तपशील: या चार तासांच्या धडक मोहिमेदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी कडक कारवाई करण्यात आली:
- फिक्स पॉईंट्स: १६ ठिकाणी कडक बंदोबस्त.
- पेट्रोलिंग: ०५ ठिकाणी नियमित पेट्रोलिंग.
- नाकाबंदी: ३१ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी.
गुन्हेगारांवर आणि अवैध धंद्यांवर कारवाई:
- मोटार वाहन केसेस: ९१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई.
- केबल चोरी उघड: १ केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.
- NDPS केसेस: २ अंमली पदार्थ संदर्भात गुन्हे दाखल.
- म.पो.क १-२२: १४ गुन्हे दाखल.
- फरारी/पाहिजे गुन्हेगार: १३ फरारी/पाहिजे गुन्हेगारांचा तपास करून २० पैकी १७ जणांना पकडण्यात यश.
- हिस्ट्रीशिटर/माहितगार गुन्हेगार: १३ हिस्ट्रीशिटर आणि २० माहितगार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
इतर महत्त्वाच्या तपासण्या:
- वॉरंट बजावणी: ३ नॉन-बेलेबल वॉरंट (NBW), ६ बेलेबल वॉरंट (BW) आणि १२ समन्सची बजावणी.
- वाहने तपासणी: ८७२ वाहनांची तपासणी.
- व्यक्ती तपासणी: १७१६ व्यक्तींची तपासणी.
- लॉज/हॉटेल/धाबे तपासणी: ६२ लॉज, ४६ हॉटेल आणि ११ धाब्यांची तपासणी.
- बँक/ए.टी.एम. तपासणी: १५ बँका आणि १७ ए.टी.एम.ची तपासणी.
- धार्मिक स्थळे तपासणी: ५५ मंदिरे आणि १० मशिदींची तपासणी.
- लँडिंग पॉईंट चेक: ०३ महत्त्वाच्या लँडिंग पॉईंट्सची तपासणी.
या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मुळे जिल्ह्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सतर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत केबल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला, तर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ संदर्भात एकावर कारवाई करण्यात आली. भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.













