चिपळुणात आज महायुतीची बैठक

चिपळूण : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राजकीय रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या घटक पक्षांची १९ रोजी सकाळी ११ वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक नगर परिषद नजीकच्या स्वा. सावरकर सभागृहात होणार आहे बैठकीला तीनही पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीमधील तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्षांनी केले आहे.

आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहर तसेच मतदारसंघात केलेली विकासकामे भविष्यातील विकास योजना या बाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच ही सर्व कामे व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार आहे.

आगामी चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने शहरातील विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच आ. निकम यांनी विकासकामांसाठी उपलब्ध करून दिलेल्या भरीव निधीची तरतूद या बाबत महायुती पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने आ. निकम यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणे व महायुतीची सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेत निर्माण करणे याची राजकीय रणनिती या बैठकीत केली जाणार आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, भाजपचे ग्रामीण मंडल तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी तसेच शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 19/Jul/2025