राजापूर : राजापूर एसटी आगारातील एसटीचे उपाहारगृह मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आगामी गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी एसटीने तालुक्यात दाखल होणार असून किमान त्यापूर्वी तरी हे उपाहारगृह सुरू करावे, अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष अजीम जैतापकर यांनी केली आहे.
राजापूर एसटी आगारामध्ये असलेल्या उपाहारगृहामुळे प्रवाशांची चांगली सोय होत होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. शासनाच्या एसटी प्रवशांकरीता असलेल्या विविध सवलतींमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र राजापूर आगारात उपहारगृह नसल्याने प्रवाशांना चहा, नाश्ता, जेवण, पाण्यासाठी आगाराबाहेर शोधाशोध करावी लागत आहे.
बाहेरून येणाऱ्या गाड्या राजापूर आगारात अल्प कालावधीसाठी थांबत असल्याने एसटी उपहारगृहातून खाद्य पदार्थ घेणे या प्रवाशांना सोयीचे ठरत होते. अशातच आता आगामी महिन्यात गणेशोत्सव असल्याने उत्सवाकरिता मोठ्या संख्येने चाकरमानी तालुक्यात दाखल होणार आहेत. अशा स्थितीत एसटी उपहारगृह उपाहारगृह बंद असल्याने चाकरमान्यांचीही मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एसटीचे उपहारगृह सुरू करावे, अशी मागणी जैतापकर यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 19/Jul/2025














