रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकात एका मनोरुग्ण तरुणाने लिफ्टवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र रत्नागिरी पोलिस, रेल्वे सुरक्षा दल (RPF), अग्निशमन दल आणि एका मनोरुग्ण सेवकाच्या तत्काळ आणि प्रसंगावधानाने त्याचे प्राण वाचले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
गुरुवारी रात्री ९.४५ च्या सुमारास रत्नागिरी पोलिस ठाण्यातील अधिकारी श्री. सावंत यांना रेल्वे स्थानकावरील लिफ्टवर एक तरुण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने चढल्याचा फोन आला. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठवण्याची विनंती केली. पालिकेचे विचारे यांनी या विनंतीला मान देऊन तात्काळ अग्निशमन दल आणि त्यांची टीम रेल्वे स्थानकाकडे रवाना केली.
दरम्यान, आरपीएफचे विधाते यांच्याशी संपर्क साधल्यावर तो तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आले. यामुळे तत्काळ मनोरुग्ण सेवक सचिन शिंदे यांना बोलावण्यात आले आणि त्यांनीही तातडीने रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. यावेळी आरपीएफ प्रमुख विधाते आणि पोलिस निरीक्षक विवेक पाटील हेही ताफ्यासह परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज होते.
तरुणाला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. सचिन शिंदे त्या तरुणाची मनधरणी करत होते, तर शहर पोलिस निरीक्षक पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनीही त्याला समजावून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. अखेर, सचिन शिंदे यांनी धीराने तरुणाकडे हात पुढे करून त्याचा हात पकडला. याच संधीचा फायदा घेत सुहेल मुकादम यांनी वेगाने शिडीवर चढून त्या तरुणाला वरती जाऊन पकडले आणि ताब्यात घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 19/Jul/2025














