संगमेश्वरमध्ये घरफोडी: चालकाचे दागिने, रोकड व मोबाईल लंपास

संगमेश्वर, [१९ जुलै, २०२५] : संगमेश्वर तालुक्यातील कोड असूर्डे येथील राधाकृष्ण मंदिराशेजारी राहणाऱ्या एका एस.टी. चालकाच्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे २७,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. यात रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईलचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री १२.३० ते सकाळी ६.१५ च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी विनायक कृष्णनाथ संसारे (वय ५३, व्यवसाय: चालक, एस.टी. डेपो चिपळूण) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. चोरट्याने कपाटाची चावी वापरून ते उघडले आणि त्यातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.

चोरट्यांनी लंपास केलेला ऐवज:

१०,०००/- रुपये रोख रक्कम (५०० रुपयांच्या २० नोटा)

४,०००/- रुपये रोख रक्कम (५०० रुपयांच्या ७ नोटा, २०० रुपयांच्या २ नोटा, १०० रुपयांची १ नोट)

३००/- रुपये किमतीचा चांदीचा एक पैंजण जोड

२००/- रुपये किमतीची चांदीची दोन जोडवी

१०,०००/- रुपये किमतीचा विवो कंपनीचा Y39 मॉडेलचा जुना मोबाईल

१५००/- रुपये अंदाजे नाणी (२, ५, १० रुपयांची)

५००/- रुपये किमतीची नाकातील सोन्याची एक नथ

५००/- रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची सोन्याचा मुलामा असलेली चेन

५००/- रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचा मुलामा असलेले मंगळसूत्र

एटीएम कार्ड

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, १९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.१८ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३१ (४) आणि ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 19-07-2025