मालगुंड येथील धम्मचेतना बुद्धविहारात उद्या वर्षावास धम्मप्रबोधन कार्यक्रम

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील धम्मचेतना बुद्धविहारात २० जुलै रोजी वर्षावास धम्म प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी व संस्कार समिती रत्नागिरी, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १७ मालगुंड तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळ मालगुंड स्थानिक व मुंबई मंडळ आणि आदर्श महिला मंडळ मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.

यावेळी करुणा पवार या प्रमुख प्रवचनकार म्हणून धम्मविषयक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हा कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १७ चे अध्यक्ष रविकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

याप्रसंगी रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत तसेच संस्कार समितीचे प्रमुख पदाधिकारी, बौद्धाचार्य व श्रामणेर आणि गावावर शाखांचे प्रमुख प्रतिनिधी व धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या वर्षावास कार्यक्रमाच्या रूपरेषेत सुरुवातीला धम्मचेतना बुद्धविहारातील भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीसमोर उपस्थितांच्याहस्ते पुष्पहार अर्पण, गंध व दीपप्रज्वलन, बुद्धवंदना, स्वागत, धम्म प्रवचन, कार्यक्रमाचे अध्यक्ष व तालुका शाखेचे अध्यक्ष यांचे मार्गदर्शनपर मनोगत आणि शेवटी आभार प्रदर्शन असे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासद बंधु भगिनी विशेष मेहनत घेत आहेत.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पवार आणि मालगुंड शाखेचे अध्यक्ष रविकांत पवार यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 19/Jul/2025