रत्नागिरी : कोकणनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनादरम्यान झालेल्या दोन घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यामार्फत या घटनेची चौकशी होणार असल्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. याचा तत्काळ चौकशी अहवाल देण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
या चौकशीत अडथळा नको म्हणून शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर घरगुती अडचणीचे कारण देऊन सुटीवर गेले आहेत. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांची नियुक्ती करण्यात आली. दसऱ्याच्य पूर्वसंध्येला कोकणनगर येथून पथसंचलन सुरू असताना अन्य समाजातील काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून संचलनात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सकल हिंदू समाजाच्या वतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी माजी नगरसेवक मुसा काझी यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्याच रात्री कोकणनगर येथे मोहल्यात घुसलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर पोलिसांनी सागर प्रकाश कदम, यश नितीन सुर्वे, शुभम संजय साळवी यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला होता. या दोन्हीही घटनानंतर या प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एसआयटीची स्थापन करून चौकशी अहवाल लवकरात लवकर देण्यात सूचनाही केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 17/Oct/2024














