रत्नागिरी : जुलै महिना मानव तस्करीविरोधी जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २९ जुलै रोजी जिल्हा न्यायालय सभागृहात जनजागृती शिबिर होणार आहे.
अनेक महिला आणि मुली फसवणूक, प्रेमाचे आमिष, लग्नाचे आमिष किंवा नोकरीचे आश्वासन यामुळे वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात. त्यांच्यामागे बहुतेक वेळा संघटित गुन्हेगारी टोळी कार्यरत असते. पीडित महिलांनी अनेकदा यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तरी समाजाकडून आधाराऐवजी अपमान, अवहेलना आणि दुर्लक्षच मिळते.
अशा महिलांना छळ, आजारपण आणि अपमानास्पद आयुष्य जगणे भाग पडते. कोकणातील काही भागांमध्येही अशा घटनांमध्ये वाढ होत असून, हा प्रकार आता गंभीर सामाजिक संकट बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर अन्यायरहित जिंदगी या गोव्यातील सामाजिक संस्थेतर्फे मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या सहकार्याने एक विशेष जनजागृती शिबिर रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर २९ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत जिल्हा न्यायालय सभागृहात होणार आहे.
शिबिरात मानव तस्करीची कारणमीमांसा, कायदे, पुनर्वसनाच्या योजना, मानसिक आरोग्याचे मुद्दे आणि समाजाची भूमिका या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. हे शिबिर महिला व बालकल्याण विभाग, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था, महिला संघटना, शासकीय अधिकारी तसेच संवेदनशील नागरिकांसाठी खुले आहे.
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी डॉ. श्रुतिका कोतकुंडे (सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण, ०२३५५-२६०२००) यांच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 19-07-2025














