रत्नागिरी, [१९ जुलै, २०२५] : केंद्र व राज्य पुरस्कृत महाआवास योजनेत (रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना) सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आणि वैयक्तिक लाभार्थ्यांचा गौरव सोहळा नुकताच स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात ग्रामपंचायत धामणसेंने ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ अंतर्गत एकावन्न घरकुले मंजूर करून ती पूर्णत्वाकडे नेल्याबद्दल तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. याच गावातील सौ. सुवर्णा आत्माराम रहाटे यांना उत्कृष्ट घरकुल लाभार्थी म्हणून विशेष गौरवण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारींच्या हस्ते सन्मान
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी प्रकल्प अधिकारी विजयसिंह जाधव आणि गट विकास अधिकारी चेतन शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेला यश
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी यावेळी बोलताना रत्नागिरी तालुक्यात घरकुल प्रकल्पांचे काम उत्तम रीतीने पार पडल्याचे कौतुक केले. भविष्यात हे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोकणातील घरकुल मंजुरीच्या प्रक्रियेतील सहहिस्सेदारांच्या संमतीचा प्रश्न सामंजस्याने सोडवून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच, भूमिहीन लाभार्थ्यांसाठी उपलब्ध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ग्रामपंचायत धामणसेंचे सरपंच अमर रहाटे, तत्कालीन उपसरपंच अनंत जाधव, सदस्या सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी, सौ. वैष्णवी विलास धनावडे, सदस्य समीर सांबरे व संजय गोनबरे आणि ग्रामविकास अधिकारी इंगळे यांनी या सोहळ्यात उपस्थित राहून गौरवाचे क्षण अनुभवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेनुसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाचा निधी पोहोचवून खर्च करण्याचे काम सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य प्रामाणिकपणे करत असल्यामुळेच ग्रामपंचायत धामणसेंला हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक
सरपंच अमर रहाटे यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी या कामांना नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला आहे आणि ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या एकजुटीनेच हे यश शक्य झाले आहे. येत्या काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ग्रामपंचायत धामणसें आणि ग्रामस्थांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.













