चिपळूण : कळंबस्तेतील रेल्वेफाटक दुरूस्तीचा सिलसिला कायम

चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावरील कळंबस्ते येथील रेल्वेफाटक दुरूस्तीचा सिलसिला कायम आहे. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास मालगाडी निघून गेल्यानंतरही दोन्ही बाजूचे फाटक तांत्रिक बिघाडामुळे उघडले नाही. फाटक उचलून वाहतूक सुरू होण्यासाठी येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न केला तरी फाटक वर गेलेच नाही. शेवटी प्रवाशांनी हाताने उचलून ते वर केल्यानंतर सुमारे अर्धातास विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत झाली.

कोकण रेल्वेमार्गावरील कळबंस्ते येथील रेल्वेफाटकातील तांत्रिक बिघाडाचे सत्र गेल्या काही महिन्यात सुरूच राहिले आहे. यापूर्वी २२ फेब्रुवारीनंतर ४ मार्चला रेल्वेफाटक तांत्रिक बिघाडामुळे न पडल्याने मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस काही काळ थांबवावी लागली होती.

त्यानंतरच्या दुरुस्तीनंतर चार महिने सुरळीत गेल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा असा प्रकार घडला आहे. सकाळी दिल्लीला जाणारी मंगला एक्स्प्रेस निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने मालगाडीही येथून मार्गस्थ झाली; मात्र या दरम्यान खाली आलेले फाटक काही केल्या वर उचलत नव्हते. काही वेळेला थोडे वर आल्यावर मध्येच अडकत होते. त्यातूनच काही वाहनचालक पुढे जाऊन थेट पटरीवर थांबत होते. या दरम्यान कळंबस्ते-धामणंद मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. प्रवाशांनी हाताने ते वर केले आणि वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 21/Jul/2025