रत्नागिरी : विधासनसभा निवडणुकीसाठी आमचा पक्ष सज्ज झाला आहे. येत्या दोन दिवसांत महायुतीची जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे विधान करत माजी आमदार बाळ माने हे कुठेही जात नसून ते भाजपचेच आहेत आणि ते भाजपचेच राहणार असल्याचे नवनिर्वाचित आमदार व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.
सध्या चित्रा वाघ या रत्नागिरी दौऱ्यावर असून रत्नागिरी भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. विधासभेसाठी भाजपची पूर्णपणे तयारी झाली असून जाहीरनामा प्रसिद्ध न करता लोकांना भाजपकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेतले जाणार आहे. शासनाने काढलेली लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचली असून यामुळे महिला खूश झाल्या आहेत, असे वाघ यांनी सांगितले.
राज्यात २८८ जागांसाठी महायुतीचे उमेदवार असणार असून येत्या दोन दिवसात जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या नंतर जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याचा भाजप कार्यकर्ते मनापासून काम करतील. सर्वच ठिकाणी आमचे उमेदवार निवडून कसे येतील, याकडे लक्ष दिले जाईल, असे वाघ म्हणाल्या. माजी आमदार बाळ माने हे भाजपचेच आहेत आणि पुढे ते भाजपचेच राहणार आहेत यामध्ये शंका नाही, असे स्पष्ट करून उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त करणे हे गैर नाही, असे वाघ यांनी सांगितले. बाळ माने हे भाजपचे प्रामाणिकपणे काम करत आहेत. एक चांगले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत हे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 17/Oct/2024













