खेड : चिंचघरमध्ये घरावर वीज पडून मुलगा जखमी

खेड : तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, मेघगर्जनेसह कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील चिंचघर येथे घरावर वीज कोसळून १२ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १६) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वीज कोसळल्याने भागोजी मेटकर यांच्या घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरातील विद्युत उपकरणे व वायरिंग जळून गेली. घरावरील कौले उडाल्यामुळे एक लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. घरातील मुलाच्या तोंडावर व हातावर विजेच्या ठिणग्या पडल्याने तो जखमी झाला. पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. प्रशासनाने घडलेल्या घटनेचा पंचनामा करावा अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 17/Oct/2024