संगमेश्वर : माभळे ते पैसाफंड हायस्कूल दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असलेला माभळे ते पैसाफंड हायस्कूल दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी सध्या अतिशय खराब झाला आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्यामुळे त्यामधून चालणे म्हणजे सामान्य नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्धांची गैरसोय होत आहे. महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या होत्या. त्यानंतर संगमेश्वर टप्प्यातील रस्त्यांची अवस्था बिकटच आहे. त्याचा फटका नियमित ये-जा करणाऱ्यांना बसत आहे.

या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ सुरू असते. मात्र, ठेकेदार कंपनीकडून कोणतीही दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत आता व्यथा मांडायची तरी कुणाकडे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. या परिसरात असलेल्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. शाळेत जायचे म्हणून बाहेर पडलेले विद्यार्थी चिखलाने कपडे खराब झाल्यामुळे घरी परत जात आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याची गंभीर दखल घेऊन तत्काळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना कराव्यात आणि सामान्य जनतेच्या सुरळीत दळणवळणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी संगमेश्वरवासीयांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 21/Jul/2025