मंडणगड : मंडणगड शहरात नागरी वस्तीतील शासकीय धान्य गोदामामुळे परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने हे गोदाम भिंगळोली येथे स्थलांतरित करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अॅड. राकेश साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांची मंत्रालय येथे भेट घेऊन मंडणगड शहराच्या मुख्य चौकाजवळ असलेले शासकीय गोदाम भिंगळोली येथील शासकीय जागेत स्थलांतरित करण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्यासंदर्भात मंत्रालयातील संबंधित कार्यालयाकडून निवेदनाची दखल घेण्यात आली असून, संबंधित खात्याकडे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पाठवल्याची माहिती अॅड. राकेश साळुंखे दिली.
तालुक्यातील महसूल विभागाचे शासकीय गोदाम हे नगरपंचायत हद्दीत असून, मंडणगड शहरात नागरी वस्तीत मुख्य नाक्यात आहे. त्या ठिकाणी शहराचे ठिकाण असल्याने अस्वच्छता आणि वाहतूककोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. हे ठिकाण तहसील कार्यालयापासून सुमारे तीन कि.मी. अंतरावर असल्याने ते नियंत्रणासाठी गैरसोयीचे आहे. शिवाय ही जागा मोक्याची व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, मंडणगड शहराच्या व्यापारासाठी बाजारपेठ निर्माण होण्याच्या हेतूने ही जागा सोयीची व महत्त्वाची आहे.
यासाठी स्थानिक व्यापारी यांच्यासह शासनाने एकत्रितपणे व्यापारीसंकूल तयार केल्यास एक मोठी बाजारपेठ शहरामध्ये तयार होऊन शहराचे चित्र पालटू शकते. या गोदामाचे स्थलांतर तहसील कार्यालय या ठिकाणी करण्यासाठी आवश्यक शासकीय जागा भिंगळोली येथे उपलब्ध असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 21/Jul/2025














