दापोली : बिबट्याच्या हल्ल्यात दोन जनावरांचा मृत्यू

गावतळे : दापोली तालुक्यातील उन्हवरे परिसरात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील आठवड्यात एकाच वेळी दोन जनावरांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक गाय जागीच ठार झाली, तर दुसरी गंभीर जखमी झाली होती. तिचाही मृत्यू झाला आहे.

उन्हवरे-तळवटकरवाडी येथील शेतकरी शांताराम कानसरे व सुनील कदम हे उन्हवरे सडा परिसरात पाळीव जनावरे चरावयास घेऊन जातात. ते नेहमीप्रमाणे १४ जुलै रोजी जनावरे चरायला घेऊन गेले होते. त्यावेळी बिबट्याने त्या जनावरांवर हल्ला केला. त्यात एका गायीचा जागीच मृत्यू झाला, तर एक गाय बिबट्याच्या तावडीतून जखमी अवस्थेत निसटली. मात्र, ती दोनच दिवसांत मृत पावली. मृत जनावरांचा वनविभागाने पंचनामा केला आहे.

या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थांनी जनावरांवर झालेला हल्ला हा बिबट्याकडून नव्हे, तर पट्टेरी वाघाकडून झाला असावा, अशी भीती व्यक्त केली. मात्र, वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी पंचनामा केल्यानंतर दापोली तालुक्यात अजूनही पट्टेरी वाघ अस्तित्वात नसल्याचे सांगत ग्रामस्थांचे मत खोडून काढले. तसेच मृत पावलेल्या जनावरांच्या मालकाला नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल, असेही सांगितले. उन्हवरे परिसरात वनविभागाचे पथक गस्त घालणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 21/Jul/2025