रत्नागिरी : आस्था सोशल फाउंडेशनचे फिरते श्रवण केंद्र सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यातील श्रवण बाधितांच्या योग्य वेळी तपासण्या होऊन, पुढील उपचार घेणे शक्य होऊ शकते. त्यातून त्यांना श्रवणदोष व त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागणार नाहीत व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. याकरिता आस्था सोशल फाउंडेशनने फिरते श्रवण चाचणी केंद्र सुरू केले. त्याचे उ‌द्घाटन शनिवारी केले.

आस्था फाउंडेशन दिव्यांगांसाठी समर्पित संस्था आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. श्रवण बाधित दिव्यांगांकरिता संस्थेमार्फत २०१८ पासून या कानमंत्र श्रवण सक्षमतेचा या प्रकल्पाअंतर्गत नियमितपणे आस्थामध्ये शिबिर आयोजित केले जात आहे. शिबिरादरम्यान निदान झालेल्या बालकांची शस्त्रक्रिया होऊन नियमित थेरपी दिल्यामुळे अशी बालके मुख्य प्रवाहात येऊन समावेशित शिक्षण पद्धतीने शिक्षण घेत आहेत.

पुणे येथील रामराज्य सहकारी बँकेचे संचालक रामकृष्ण फुले, संदेश इनामके यांच्या प्रयत्नातून व रिटेनमायर इंडिया प्रा. लि. ठाणे यांच्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पातून कार्यकारी संचालक रोहित राऊत व व्यवस्थापक संजीव चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून दिला. पुढील उपचार शक्य झाल्याने त्यांना आयुष्यभर श्रवण दोष व त्याचे परिणाम सहन करावे लागणार नाहीत व ते समाजाचा मुख्य प्रवाहात येतील. फिरत्या श्रवण चाचणी केंद्राचे उद्घाटन शामसुंदर काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व सौ. चंद्रकला पाथरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी चिंतामणी मोटर्सचे उज्ज्वल साठे, इंदुमती भुजबळ, कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण, ऑडिओलॉजिस्ट प्राजक्ता भोगटे सातवसे, आदित्य कन्स्ट्रक्शनच्या जैतपाळ, राष्ट्रसेविका समितीच्या सौ. उमा दांडेकर, आस्थाच्या अध्यक्ष सौ. सविता काळे, उपाध्यक्ष ऋषिकेश दाभाडे, सचिव सुरेखा पाथरे, खजिनदार साक्षी चाळके, स्पीच थेरपिस्ट संकेत चाळके, सहायक कल्पेश साखरकर, आस्था थेरपी सेंटरच्या प्रमुख संपदा कांबळे, लाभार्थी उपस्थित होते.

आहेत या सुविधा
या फिरत्या श्रवण चाचणी केंद्रामध्ये नवजात बालकांसह, प्रौढांकरिता ओएई, बेरा, पीटीए आदी श्रवण चाचण्या तंत्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी साऊंड ट्रीटेड रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामुळे श्रवणबाधिर्ताच्या तपासण्या योग्य वेळी आणि वेळेत करणे शक्य होणार आहे.

सातत्याने प्रयत्न करून देखील गरजू आपल्यापर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळे, कदाचित परवडत नाही म्हणून, सहज पोहचू शकत नाही म्हणून, गरजू वंचित राहत आहेत, असे निदर्शनास आले. हे विचारात घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. याकरिता फिरते केंद्र सुरू केले आहे- सुरेखा पाथरे, सचिव, आस्था फाउंडेशन

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 21/Jul/2025