राजापूर : शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक अवस्था यंदा बिकट होणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही रिक्त जागांवर बीएड आणि डीएड पात्रताधारकांमधून मानधन तत्त्वावर शिक्षक भरावेत, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी जिल्हा डोंगराळ असून असंख्य वाड्यावस्त्यांमध्ये विखुरलेला आहे. अनेक वाड्यावस्त्यांपर्यंत जाण्यासाठी धड रस्तेही नाहीत. या भागातील मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हापरिषदेमार्फत वाडी तिथे शाळा सुरू केली आहे. त्यामुळे गावातच शिक्षणाची सोय झाली आहे. सध्या ग्रामीण भागातील शाळांची अवस्था चिंताजनक झालेली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक शिक्षक सेवानिवृत्त झालेले असून शिक्षक भरतीनंतरही अनेक पदे रिक्त आहेत. काही शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्यामुळे रिक्त पदांमध्ये भर पडली आहे.
या साऱ्यांमध्ये जिल्ह्यातील अनेक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. काही मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये एक वा दोन शिक्षक कार्यरत आहेत. या साऱ्यांमुळे जिल्हापरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे. अनेक वर्गासाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने नियमित अध्यापना खंडीत होवून अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नाही. त्यातून विद्यार्थ्यांच्या मुलभूत शैक्षणिक कौशल्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. भविष्यात त्यात अधिक घसरण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन मानधन तत्वावर रिक्त असलेल्या शिक्षक जागांवर डीएड, बीएड पात्रता धारकांची नियुक्ती करावी. त्याबाबत अजुनही अद्याप कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी नागले यांनी केली आहे.
राजापूर, खेड तालुक्यांत सर्वांधिक
जिल्ह्यात २ हजार ३०० जिल्हा परिषद शाळा असून, त्यामध्ये ५ हजार ७०० शिक्षक कार्यरत आहेत. राजापूर आणि खेड या दोन्ही तालुक्यांमध्ये सर्वाधिक शिक्षक पदे रिक्त आहेत. सध्या बदली प्रक्रिया सुरू असून त्याद्वारे दोन्ही तालुक्यांतील रिक्त पदांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे, परंतु भरतीच नसल्याने जिल्ह्यातील रिक्त पदांचे आकडे जैसे थेच राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 21/Jul/2025














