गुहागरच्या जागेचा निर्णय चार दिवसांत : देवेंद्र फडणवीस

गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघ भाजपला मिळावा म्हणून आम्ही आग्रही आहोत. येत्या चार दिवसांत गुहागरच्या जागेचा निर्णय होईल. सर्वांनी ही जागा जिंकण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर रत्नागिरीतील कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

भाजपचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांच्यापुढे गुहागरची जागा मिळाली पाहिजे, असे ठामपणे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे गुहागरमधील मुख्य पदाधिकारी मुंबईत गेले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वरिष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रसाद लाड आदींची भेट घेतली. गुहागरमधील पक्षाची स्थिती, कार्यकत्यांची मानसिकता त्यांच्यापुढे मांडली.

गेले वर्षभर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजप कार्यकर्ते झटले आहेत. गुहागरची जागा भाजपलाच मिळणार, हा विश्वास वरिष्ठांनी दिला होता. मतदार संघात कहो दिलसे नातू फिरसे, या टॅगलाईनला धरून प्रचारही सुरू झाला.

या उत्साहावर सर्वपित्री अमावास्येच्या आधी दोन दिवस पाणी फेरले गेले. गुहागर विधानसभा मतदार संघ शिवसेना लढणार, असे वृत्त धडकले. खासदार श्रीकांत चव्हाण यांच्या नात्यातील विपुल कदम यांचे नाव शिवसेनेकडून पुढे आले. त्या पाठोपाठ गुहागर विधानसभा क्षेत्रात विपुल कदम यांचा फोटो व नाव असलेले धर्मवीर २ चे बॅनरही झळकले. विपुल कदम यांनी मतदार संघात तीन प्रचार कार्यालयांची उ‌द्घाटने केली. त्यामुळे भाजप कार्यकत्यांचा प्रचार स्वीच ऑफ झाला. ही बाब वरिष्ठ नेत्यांपुढे मांडली. त्या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी गुहागर मतदार संघ जागावाटपात भाजपला मिळण्यासाठी आम्ही आग्रही आहोत, असे सांगितले तसेच पुढील चार दिवसात निर्णय पोचेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना जिंकण्याच्या तयारीला लागा, अशी सूचना केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 17/Oct/2024