लाडक्या बहिणींचा आनंदाचा शिधा गोदामात

सोलापूर : राज्यातील पावणेदोन कोटी शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती सणावेळी १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा शासन निर्णय झाला होता. त्यात साखर, रवा, हरभरा डाळ व तेल (प्रत्येकी एक किलो) अशा चार वस्तू आहेत. पण, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जवळपास ३३ लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळालेला नाही. वस्तूंच्या पाकिटावर नव्हे, तर त्या वस्तू एकत्रितपणे ज्या पिशवीतून दिल्या जातात, त्यावर सत्ताधाऱ्यांचे फोटो असल्याने आनंदाचा शिधा आता निवडणूक होईपर्यंत गोदामामध्येच ठेवावा लागणार आहे.

राज्य शासनाने दरवषीं बहुतेक सण-उत्सवांत सामान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना अवघ्या १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचे निर्णय घेतले. मागील गौरी गणपतीमध्येही अशाचप्रकारचा निर्णय झाला होता. मात्र, अनेक जिल्ह्यांना तो वेळेत उपलब्ध झाला नाही आणि आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने त्याचे वाटप थांबले आहे. साखर, रवा, हरभरा डाळ व तेलाच्या पिशवीवर कोणत्याही राजकीय पक्षांचे फोटो नाहीत, त्यामुळे त्याच्या वाटपाला काहीही अडचणी नाहीत. मात्र, शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे त्यांचे वाटप पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेल्या पिशवीत घालून करणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्या वस्तू धान्य दुकानांमध्ये असतानादेखील त्याचे वाटप करता येणार नसल्याची वस्तुस्थिती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 17/Oct/2024