पावस : पर्यटकांची गर्दी होणाऱ्या भागात आणि धबधब्यांच्या ठिकाणी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने पेट्रोलिंग सुरू केले आहे. त्याचबरोबर धोकादायक ठिकाणी माहिती फलक लावण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत. त्याप्रमाणे निरुळ नदीकिनारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फलक लावण्यात आला आहे.
निरूळ येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून दारू व मद्यपान करून धिंगाणा घालत असतात. त्या पार्श्वभूमीवर परिसरात या गोष्टींना आळा बसावा या दृष्टीने फलक लावण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याबाबत परिसरातील लोकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी (ता. १९) आरे-वारे किनारी चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर गावखडी, पूर्णगड, गणेशगुळे, वायंगणी, रनपार या परिसरात पोलिसांनी पेट्रोलिंग सुरू केले आहे. त्याचबरोबर पावस, निरूळ, गोळप आदी परिसरात नदीकिनारी अनेक पर्यटक मौजमजा करण्यासाठी येत असतात.
त्यावर आळा घालण्याच्यादृष्टीने प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सूचनाफलक लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटील म्हणाले, धोकादायक किनारे असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतींना सूचनाफलक लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गर्दीच्यावेळी पोलिसांचे पेट्रोलिंगही सुरू केले आहे. पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यासह धबधब्यांच्या ठिकाणी जाऊ नये. मुसळधार पावसामुळे धबधब्यांचे पाणी अचानक वाढते. ही बाब तेथे पोहणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे दुर्घटना घडतात. हे टाळण्यासाठी पर्यटकांनी पावसाळ्यात अशा ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 22/Jul/2025














