रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यासाठी मुंबईकर चाकरमान्यांना घेऊन ५ हजार जादा एसटी बस कोकणात येणार आहेत. गावी आलेल्या मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुलभ व्हावा म्हणून रत्नागिरी विभागाकडून २ हजार ५०० जादा गाड्यांचे नियोजन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या बसचे ग्रुप बुकिंगचे आरक्षण २२ जुलैपासून सुरू होणार आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून कोकणासाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. महिलांसाठी व ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के तर ७५ वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटदरात १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. बस आरक्षणासाठी npublic.msrtors.com. या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संबंधित बसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या एमएसआरटसी बस रिझव्हेंशन अॅपद्वारे उपलब्ध होणार आहे. गणेशोत्सव कालावधीत एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक, बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, तसेच कोकणातील महामार्गावर वाहनदुरुस्ती पथक तैनात करण्यात येणार आहे. मुंबईहून येणाऱ्या बसचालकांना मार्ग दिशादर्शनासाठी खास पथक कार्यरत राहणार आहे.
दरम्यान, गतवर्षी मुंबईहून ४ हजार ३०० बस कोकणात आल्या होत्या. यावर्षी ५ हजार गाड्या कोकणात पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी विभागातून गतवर्षी परतीसाठी २ हजार २०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी २ हजार ५०० गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. गौरी गणपती विसर्जन २ सप्टेंबरला असल्याने त्या दिवसापासून परतीच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून कोकणासाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 PM 22/Jul/2025














