चिपळूण : गुहागर-विजापूर महामार्गावरील पिंपळी ते पोफळीपर्यंतचा रस्ता खड्डेमय बनला आहे. जागोजागी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे. रस्त्यावरचे खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख मुस्ताक सय्यद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
या मार्गावरून जाताना जौव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांमधून होत आहे. मुंढे येथील शासकीय रोपवाटिकेसमोर रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. येथे रात्री वीज नसते. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते. रात्री हे खड्डे दिसत नाहीत, केवळ पाणी दिसते. त्यात वाहने आदळतात आणि अपघात होतो. तशीच अवस्था पोफळी येथे ठिकठिकाणी झाली आहे. येथील सय्यदवाडीत माध्यमिक शाळेसमोरच मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांना तलावाचे स्वरूप आले आहे.
खड्ड्यात वाहने आढळल्यानंतर त्यातील पाणी पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर उडते. त्यामुळे त्यांचे गणवेश खराब होतात. खड्ड्यांमध्ये वाहने आदळल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्याही या मार्गावर धावतात. त्या खड्यात आदळल्यानंतर बंद पडतात. एसटी बंद पडल्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत भरपावसात रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. मालवाहतुकीची वाहनेही खड्यात आदळून बंद पडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पोफळी-चिपळूण मार्गावरील डांबरी रस्त्याची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना दुचाकीचालकांचा अपघात होतो. मोठी वाहने खड्ड्यात घातल्याशिवाय पर्याय उरत नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हे खड्डे भरावेत-मुस्ताक सय्यद, शाखाप्रमुख, पोफळी, ठाकरे गट
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 22/Jul/2025














