कोल्हापूर : राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा. याशिवाय दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी येत्या दि. 24 जुलै रोजी राज्यभर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा करत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.कसबा बावड्यातील श्री मंगल कार्यालयात हुंकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी ते बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, राज्यातील शेतक-यांचा सातबारा कोरा करावा यासाठी अन्नत्याग आंदोलन झाले. पायी यात्रा काढली. मात्र राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. याबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या दि. २४ जुलै रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संस्थेच्या वतीने घेण्यात आला त्यांनी सांगितले. तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. जर शेतीमालाला चांगला भाव भेटला तर देश सुखी व्हायला वेळ लागणार नाही. मग शेतकरी सरकारकडे कर्जमाफी करा म्हणून कधीच मागणी करणार नाही. पण शेतमालाला चांगला भाव मिळत नाही, हे मोठे दुर्दैव आहे.
दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले, अपंगांना आपल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावे लागते, याच्यासारखे दुर्दैव काय? असा प्रश्न करून ते म्हणाले सरकारने दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये एक हजार रुपयाची वाढ करून ती आता अडीच हजार रुपये केली आहे. ही संघटनेने दाखविलेल्या ताकदीचे यश आहे. अजूनही आपले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी आपणास रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 22-07-2025














