राजिवडा परिसरातील ‘बांगलादेश’ नावाचा उल्लेख हटवावा : शिवसैनिकांची मागणी

​रत्नागिरी : शहरातील राजिवडा (Rajivada) परिसरातील “बांगलादेश” (Bangladesh) या नावाच्या उल्लेखाला आक्षेप घेत, हा उल्लेख दैनंदिन व्यवहारात आणि प्रशासकीय कामकाजातून वगळण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या (Shivsena) स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

​राहुल पंडित, जिल्हाप्रमुख, रत्नागिरी (दक्षिण) आणि माजी नगराध्यक्ष, रत्नागिरी नगर परिषद यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वीपासून राजिवडा पुलाखालील परिसराला जोडून असलेल्या काही भागांचा उल्लेख दैनंदिन जीवनात किंवा व्यावहारिक भाषेत “बांगलादेश परिसर” किंवा “बांगलादेश झोपडपट्टी” असा केला जातो. हा उल्लेख अयोग्य असून तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

​या संदर्भात, गिरोबा चौक ते तळ्याजवळील तेली आळी, रत्नागिरी ते श्री देव काशी विश्वेश्वर मंदिर, राजिवडा या परिसराचा उल्लेख “श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग राजिवडा” असा करावा, अशी सूचना निवेदनात करण्यात आली आहे.

​या निवेदनावर राहुल पंडित यांच्यासह महेश म्हाप, बिपिन बंदरकर, प्रदीप उर्फ बंड्या साळवी, सुरेश मयेकर, सुहेल मुकादम, विकांते पाटील, संजय सोळवी, विजय खेडेकर आणि संजय हळदणकर यांच्या सह्या आहेत.

​स्थानिक नागरिकांच्या भावनांचा आदर करत हा जुना उल्लेख बदलण्यात यावा, अशी अपेक्षा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 22-07-2025