चिपळूण : तालुक्यातील पाचाड-चिलेवाडी येथील ग्रामस्थ आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येत ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत श्रमदानातून सात बंधारे उभारले आहेत. याचबरोबर गावातील पडीक जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडही केली. गावातील अंतर्गत रस्त्यांवरील झाडाझुडपांची स्वच्छताही केली. या उपक्रमामुळे पर्यावरण जपण्याबरोबरच पाण्याचा साठा आणि शाश्वत शेतीला हातभार लागणार माजी सभापती शौकत मुकादम यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील पाचाड येथे उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाई भासते. येथे पाण्याचे मजबूत स्त्रोत उपलब्ध नसल्याने कळवंडे येथील धरण परिसरातून गावासाठी पाणी घेऊन पाणीपुरवठा योजना राबवावी लागते. दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्याचा खर्चही वाढतो. तसेच अनेकदा गढूळ पाणीपुरवठ्याची समस्याही भेडसावते. यासाठी पाचाड-चिलेवाडीतील ग्रामस्थ व चाकरमान्यांनी वाडीतच पाण्याचे चांगले स्त्रोत निर्माण करण्यावर भर दिला. डोंगर भागात मोठे खड्डे खोदून पावसाचे पाणी जिरवण्यावर भर दिला. सात बंधारे उभारून पाणी अडवून ते जिरवण्याचे काम केले. या कामांची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम, जयंद्रथ खताते, सरपंच विकास गमरे, यांनी पाचाड-चिलेवाडीला भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 22/Jul/2025














