पर्यटन क्षेत्रात महिलांना नवी दिशा: BKVTI रत्नागिरीचा सेमिनार उत्साहात!

रत्नागिरी, (दि. २२ जुलै २०२५) : कोकणातील महिलांसाठी पर्यटन क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI), रत्नागिरी युनिटतर्फे काल, २१ जुलै रोजी, मारुती मंदिर येथील विवा एक्झिक्युटिव्ह हॉलमध्ये एक भव्य आणि मोफत शैक्षणिक सेमिनार यशस्वीरित्या पार पडला. “पर्यटन क्षेत्रात महिलांना सुवर्णसंधी – पर्यटनातील करिअर: दिशा आणि संधी” या विषयावर आधारित या सेमिनारला महिला आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
या सेमिनारमध्ये पर्यटन क्षेत्राचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आले. श्री. वैभव सरदेसाई (संचालक, प्राचीन कोकण म्युझियम, गणपतीपुळे) यांनी “कोकणातील पर्यटनाची ओळख” या विषयावर बोलताना स्थानिक पर्यटन स्थळांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले.

“पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय व रोजगार संधी” यावर श्री. मकरंद केसरकर (पार्टनर लॅटरल कन्सेप्ट, कन्सल्टन्सी आणि प्रोजेक्ट्स सर्व्हिसेस एलएलपी ट्रॅव्हियोल्युशन) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महिला उद्योजकांसाठी असलेल्या संधी, स्टार्टअप कल्पना आणि प्रत्यक्ष फील्डमधील अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले.

तर, “पर्यटन शिक्षणातील संधी” या विषयावर प्रा. डॉ. मीनल ओक (संचालक, ओक्स अकॅडमी, संचालक, परशुराम शिक्षण आणि संशोधन संस्था, चिपळूण) यांनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना या क्षेत्रात स्थिर आणि यशस्वी करिअर कसे घडवता येईल, यावर मार्गदर्शन केले.

BKVTI च्या अभ्यासक्रमांची माहिती
कार्यक्रमात BKVTI च्या टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी कोर्ससह इतर अभ्यासक्रमांबद्दल सविस्तर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन टुरिझम कोर्स समन्वयक प्रा. सोनिया मापुस्कर यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक श्री. स्वप्निल सावंत यांनी केले, तर संस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. यावेळी प्रकल्प प्रमुख श्री. मंदार सावंत देसाई, स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्या सौ. स्वरूपा सरदेसाई, BKVTI स्टाफ आणि हॉटेल इंडस्ट्रीमधील मान्यवर उपस्थित होते. कु. सिद्धी करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर BKVTI अकॅडमिक को-ऑर्डीनेटर साधना ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप सौ. स्वरूपा सरदेसाई यांनी केला.

या सेमिनारमुळे कोकणातील महिलांना पर्यटन क्षेत्रात आपले नवे करिअर घडवण्याची प्रेरणा आणि योग्य दिशा मिळाल्याचे स्पष्ट झाले. BKVTI रत्नागिरीचा मुख्य उद्देश कोकणातील महिलांना पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाद्वारे सक्षम करणे हा आहे, जो या कार्यक्रमातून सिद्ध झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 22-07-2025