रत्नागिरी : गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढती प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर घोषणा केली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी वांद्रे टर्मिनस ते रत्नागिरी दरम्यान एक विशेष गणपती स्पेशल गाडी चालवली जाणार आहे. या गाडीचे आरक्षण २३ जुलैपासून खुले होत आहे. या विशेष गाडीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात विशेषतः रत्नागिरीपर्यंत जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील, विशेषतः कोकणातील लोकांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. या काळात मुंबई आणि आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी कोकणात जातात. त्यामुळे नियमित गाड्यांवर प्रचंड ताण येतो आणि प्रवाशांना जागा मिळणे कठीण होते. हीच गरज लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्रमांक आणि बुकिंगची माहिती
मुंबईतील वांद्रे ते रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या या गणपती विशेष गाडीचा क्रमांक ०९०१५ असा आहे. या ट्रेनसाठी तिकिटांचे बुकिंग २३ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे. प्रवासी सर्व पीआरएस काउंटरवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर या गणपती विशेष साठी आपले तिकीट आरक्षित करू शकणार आहेत.
मुंबईतील पश्चिम उपनगरातून थेट कोकणात जाण्यासाठी रेल्वेने गाडी जाहीर केल्याने या कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोकणवासीयांनी या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 23/Jul/2025














