कुंभारखाणीत महावितरणचा अजब कारभार गुपचूप बदलले वीज मीटर; ग्रामस्थांची पोलिसांकडे तक्रार

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रूक येथील ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता महावितरणद्वारे स्मार्ट मीटर (इलेक्ट्रॉनिक) बसविण्याच्या बेकायदेशीर प्रक्रियेबाबत ग्राहकांच्या / ग्रामस्थांच्या मनात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या ग्राहकांनी महावितरणविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

ज्यांची घरे बंद आहेत, घर आवाराला कुलूप बंद गेट आहेत तेथे ग्राहकांची परवानगी नसतानाही बेकायदेशीररीत्या जुने मीटर काढून दुसरेच मीटर लावण्यात आले आहेत. सदरची गोष्ट अनधिकृतरीत्या सरळ सरळ ग्राहकांच्या हक्कावर अतिक्रमणच आहे. अनधिकृतपणे एकतर्फी मीटर बदलण्यात येत असल्याने अनेक ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत गावातील ग्राहकांनी संगमेश्वर पोलिस निरीक्षक, संगमेश्वर पोलिस ठाणे येथे मीटरबाबतची शासकीय पत्रके जोडून निवेदन दिले आहे. योग्य विचार होऊन न्याय मिळावा, अशी विनंती यात करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 23/Jul/2025