चिपळूण : शहरातील गुहागर बायपास मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना तसेच गुहागरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. हे खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
चिपळूण शहरातून गुहागरकडे जाण्यासाठी शहराच्या बाहेरून म्हणजेच कोलेखाजण, पावशेवाडी, उक्ताड, मिरजोळीमार्गे बायपास रस्ता काढण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाग पॉवरहाऊस येथून रस्त्याला सुरुवात होते.
गुहागरमधून येणारी मालवाहतुकीची वाहने, खासगी बस आणि एसटीच्या फेऱ्या याच मार्गावरून धावतात. सावर्डे भागातून येणारे प्रवासी चिपळूण शहरात जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करतात. या मार्गावरून दिवसाला शेकडो वाहने ये-जा करत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याची देखभाल दुरुस्ती आहे; मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे लक्ष नाही, असे दिसते. या मार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. त्यामध्ये वाहने आढळतात. खड्ड्यामध्ये पाणी चालत असल्यामुळे त्यांचा अंदाज येत नाही आणि अपघात होत आहेत. बायपास मार्गावरील डोंगर उतरल्यानंतर मिरजोळी भागातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले होते. तेथील दिव्यांग नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बांधकाम विभागाने तेथील खड्डे तात्पुरते बुजवले; मात्र बायपास मार्गावरचे खड्डे जैसे थे आहेत. या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा या खड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
गुहागर बायपास मार्गावर अपुरी वीजव्यवस्था आहे. त्यामुळे रात्री खड्डे दिसत नाहीत. त्यातून अपघात होण्याचा धोका आहे. खड्यांमुळे दिवसा रस्त्याने चालणेसुद्धा आता धोक्याचे झाले आहे-ऋषिकेश सावंत, नागरिक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 23/Jul/2025














