चिपळूण : गोंधळे ते पोसरेदरम्यान रस्त्यासाठी ग्रामस्थ करणार उपोषण

चिपळूण : तालुक्यातील गोंधळे ते पोसरेदरम्यान तांबी नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुलावरून वाहतुकीसाठी मातीचा भराव करून रस्ता करण्यात आला; मात्र पक्का रस्ता नसल्याने येथून वाहतूक सुरू झालेली नाही. पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक तेथे मोरीचे बांधकाम नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची शेती पाण्यात गेली असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही नही अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी पुलाजवळील रस्त्यावर उपोषणाचा इशारा गोंधळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.

गोंधळे ग्रामपंचायत क्षेत्रात तांबी नदीवर गोंधळे ते पोसरे हा पूल बांधून पुलाच्या दोन्ही बाजूस मातीच्या भरावाचे काम झाले आहे; मात्र रस्त्याचे मजबुतीकरण न झाल्याने पावसाळ्यात येथून वाहतूक बंद राहते. चिखल आणि निसरडा रस्ता झाल्याने येथून चालणेही शक्य होत नाही. पोसरे येथे प्राथमिक आरोग्यकेंद्र असल्याने विविध वैद्यकीय उपचारासाठी गोंधळे ग्रामस्थांना याच रस्त्यावरून आरोग्यकेंद्रात जावे लागते. तसेच पंचक्रोशीतील हा महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या मातीच्या भरावामुळे नदीपात्रातील पाणी अडले आहे.

पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था येथे केलेली नाही. परिणामी, रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या शेतजमिनी खराब होत आहेत. याची माहिती ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. अनेकदा प्रत्यक्ष जागेवरची वस्तुस्थिती अधिकाऱ्यांना दाखवली देखील. रस्त्याच्या भरावाचे काम सुरू असताना संबधित अधिकाऱ्यांना भविष्यातील उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती दिली होती. त्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची सूचना केली होती. या रस्त्यावर गोंधळे व परिसरातील काही लोकांनी परिश्रम व स्वखचनि खडी टाकून रस्ता तात्पुरत्या स्वरूपाचा केला. दरवर्षी ग्रामस्थ रस्त्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यासाठी कोणताही शासनाकडून निधी खर्च केला जात नाही; मात्र ग्रामस्थांच्या या परिश्रमाची अधिकारी कोणतीही दखल घेत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अधिकारी दखल घेत नसल्याने न्यायासाठी १५ ऑगस्टला ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

निवेदनावर गोंधळे सरपंच भूषण खेडेकर, उपसरपंच प्रकाश बारे, पोसरे येथील अजय मोहिते, लवू मोहिते, मनोज मोहिते, मजरेकौंढर येथील प्रवीण जाधव, अरूण जाधव, सतीश जाधव, संजीवनी जाधव, पूजा जाधव, रवींद्र जाधव, राजेंद्र जाधव, स्वप्नाली जाधव, सुरेश जाधव आदी शंभरहून अधिक ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.

गोंधळे ते पोसरेदरम्यान पुलाचे काम झाले तरी रस्त्याचे काम मार्गी लागलेले नाही. या रस्त्यासाठी ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करतात, निवेदने देतात; परंतु त्याला कोणी दाद देत नसल्याने आता ग्रामस्थ आक्रमक झालेत. शेतीच्या नुकसानीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. यामुळे १५ ऑगस्टला उपोषण करण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत- भूषण खेडेकर, सरपंच, गोंधळे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 23/Jul/2025