रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भारतीय जनता पार्टी शहर मंडळातर्फे काल भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
मा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ६१ महिला आणि पुरुष रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा वर्षा ढेकणे यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराची सुरुवात केली, ज्यामुळे अनेक महिला रक्तदात्यांना प्रेरणा मिळाली.
यावेळी महिला मोर्चा, युवा मोर्चा, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, तसेच इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजात सेवा आणि बांधिलकीची भावना अधिक बळकट झाली असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये संदीप उर्फ बाबू सुर्वे, निलेश आखाडे, विक्रम जैन आणि कार्यालयातील मयेकर यांचे मोलाचे योगदान लाभले, असे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी नमूद केले.














