साडवली : संगमेश्वर-साखरपा राज्यमार्गावरील साडवली सह्याद्रीनगर भागातील मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले होते. या विरोधात सह्याद्रीनगर युवासेनेने आवाज उठवल्यानंतर खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे.
या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने सह्याद्रीनगर युवासेना आक्रमक झाली. युवासेनेचे पदाधिकारी सिद्धेश सुर्वे, सौरभ मांगले, सूरज रेडीज, आदेश इंदुलकर आणि ग्रामपंचायत सदस्य विनोद वाडकर यांनी थेट देवरूख सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात जाऊन उपविभागीय अभियंता वैभव जाधव यांना खड्ड्यांच्या समस्येसंदर्भात जाब विचारत दणका दिला.
युवासेनेच्या या ठाम भूमिकेमुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत खड्डे भरण्याचे काम सुरू केले. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात सुर्वे म्हणाले, उपविभागीय अभियंता जाधव आणि त्यांच्या टीमने तातडीने काम हाती घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. मात्र, यापुढे अशा तक्रारींची वाट न बघता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवर स्वखुशीने लक्ष द्यावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 23/Jul/2025














