चिपळुणातील १६२ दिव्यांगांना मिळणार अनुदान

चिपळूण : रखडलेल्या पाच टक्के अनुदानासाठी काही दिवसांपूर्वी दिव्यांग बांधव-भगिनींनी चिपळूण पालिकेवर धडक दिली होती. हे अनुदान तातडीने वाटप करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेत नगर पालिका प्रशासनाने अनुदान वाटपाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन ते तीन दिवसांत लाभार्थी दिव्यांगांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. चिपळुणातील १६२ दिव्यांगांना १६ लाख ६१ हजार रुपयांचे वाटप केले जाणार आहे.

चिपळूण नगर पालिकेमार्फत दरवर्षी दिव्यांगांना ५ टक्के अनुदान वाटप केले जाते. गेल्या काही वर्षांपासून पालिकेवर प्रशासक आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घ्यावी लागते. यावर जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांची स्वाक्षरी असते. या प्रक्रियेला यावर्षी उशीर झाल्याने अनुदान वाटप रखडले. या संदर्भात काही दिवसांपूर्वी दिव्यांगांच्या संघटनेने दिव्यांगांसह पालिकेवर धडक देत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासाठी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्याकडे निवेदन दिले होते. दिव्यांगांच्या भावनांचा आदर करत या संदर्भात लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पेढांबकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार दोन दिवसात दिव्यांगांच्या खात्यात त्यांना मंजूर झालेली रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.

१६ लाखांचे होणार वाटप
रखडलेल्या पाच टक्के अनुदानासाठी दिव्यांग बांधव-भगिनींनी चिपळूण पालिकेवर धडक दिली होती. त्याची दखल प्रशासनाने घेत अनुदान वाटपाची हालचाल सुरू केली आहे. चिपळुणातील १६२ दिव्यांगाना १६ लाख ६१ हजार रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 23/Jul/2025