चिपळुणात ६ ऑगस्टला ‘आनंदयात्री पुलं’ कार्यक्रम

चिपळूण : माणूस वाचता वाचता समजतो आणि माणूस हसता हसता शिकतो, हे पु. ल. देशपांडे यांचे विचार आजही प्रत्येक मराठी मनाच्या गाभाऱ्यात जपले जातात. अशा या बहुरंगी, बहुढंगी, बहुगुणी व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या वतीने एक अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम ‘आनंदयात्री पुलं’ सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ६ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे रंगणार आहे.

यंदाचे वर्ष हे पु. ल. देशपांडे यांचे २५वे स्मृतिवर्ष आहे. त्या निमित्ताने त्यांचा साहित्यिक, नाट्य आणि संगीतक्षेत्रातील अमूल्य ठेवा चिपळूणमधील रसिक प्रेक्षकांसमोर नव्याने साकारला जाणार आहे. कार्यक्रमात पुलंच्या साहित्यातून, नाटकांमधून, गीतांमधून निवडक भाग स्थानिक कलाकारांच्या अभिनय, वाचन, गायन आणि नृत्य सादरीकरणांतून सादर होणार आहे. अंतू बर्वा, नारायण, वाऱ्यावरची वरातीमधील साक्ष, ती फुलराणी, आहे तुजपाशी यातील संस्मरणीय प्रसंग, नाच रे मोरा या गीतावरील नृत्य कला परंपरा अनुभवायला मिळणार आहेत. मंदार ओक यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा कार्यक्रम कांता कानिटकर यांच्या दिग्दर्शनाखाली रंगणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 23/Jul/2025