स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजप-शिंदे गट युतीची शक्यता : चव्हाण आणि सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक

रायगड, २३ जुलै २०२५ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांच्यात आज (बुधवार, २३ जुलै) चव्हाण यांच्या रायगड येथील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा झाली, तसेच आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सखोल विचारमंथन करण्यात आले.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट यांच्यात युती होणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने, कार्यकर्त्यांना योग्य न्याय कसा मिळेल, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या या भावना लक्षात घेऊन, हा प्रश्न वरिष्ठ स्तरावरच सोडवला जाईल, अशी चर्चा आहे.

या बैठकीमुळे आगामी निवडणुकांसाठी युतीची शक्यता अधिक बळावली असून, लवकरच मंत्री उदय सामंत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे युतीबाबतची आपली भूमिका अधिक स्पष्ट करतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही बैठक आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 23-07-2025